Advt.

Advt.
Showing posts with label मोटीव्हेशन. Show all posts
Showing posts with label मोटीव्हेशन. Show all posts

Monday, 13 July 2015

तुमचे प्रॉब्लेम्स सुटण्यासाठी……

-महावीर सांगलीकर
मोबाईल फोन: 8149703595


मला अनेकदा अनुभव येतो की बहुतेक लोकांना त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यात, दिलेले सल्ले पाळण्यात रस नसतो. एखाद्या विश्वासू व्यक्तिने आपल्या व्यथा ऐकून घ्याव्यात एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. आपले मन कुणापुढे तरी मोकळे केले की त्यांना बरे वाटते.

पण नुसते मन मोकळे झाले म्हणून मूळ प्रश्न कसा काय सुटेल? ज्या व्यक्तिपुढे तुम्ही मन मोकळे करता, ती व्यक्ति जर समुपदेशक असेल, अनुभवी असेल तर तिने दिलेले सल्ले तुम्ही अमलात आणले तरच तुमचे प्रश्न सुटू शकतात. पण वर लिहिल्या प्रमाणे जर अनेक लोकांना आपले प्रश्न सुटावेत असे वाटतच नाही, निदान त्यांच्या सुप्त मनात तरी, तर ते लोक सल्ले कशाला पाळतील? अनेकांच्या  बाबतीत तर असे वाटते की ते आपले प्रॉब्लेम्स एन्जॉय करत असावेत. दु:ख, व्यथा, चिंता यातच आनंद मिळत असेल तर प्रश्न सोडवून घेण्याची गरजच काय?

पण ज्यांना खरोखरच आपले प्रॉब्लेम्स सुटावेत असे वाटते, त्यांनी पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे:
तुम्हाला जे कांही प्रॉब्लेम्स असतील, ते लवकरात लवकर सुटावेत यासाठी तुम्ही लगेच प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे. तुमच्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही स्वत: चिंतन, विचार करून पुढे काय करायचे ते ठरवू शकता. तसेच गरज असेल तर तुम्ही अनुभवी व्यक्ति, समुपदेशक यांचा सल्ला घेऊ शकता. त्यांनी दिलेले सल्ले शास्त्रीय, मनोवैज्ञानिक असतील तर ते तुम्ही लगेच अमलात आणले पाहिजेत. सल्ला देणारी व्यक्ति तुम्हाला अंधश्रद्धा वाढवणारे सल्ले देत असेल (खडे, अंगठ्या, ताईत, गंडे दोरे, पूजा अर्चा, कर्मकांड वगैरे) तर अशा सल्ल्यांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे.  अशा सल्ल्यांमुळे तुम्हाला तात्पुरते समाधान मिळते. त्याचा कायम स्वरूपी उपयोग होत नाही. तुमच्या प्रॉब्लेम्सचे मूळ आणि मुख्य कारण तुमचा उपजत स्वभावदोष आणि त्यामुळे तुमच्या हातून होत असणाऱ्या चुका हेच असते, ही गोष्ट तुम्ही नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. 

प्रॉब्लेम सोडवण्यात चालढकल केल्याने तुमचे प्रॉब्लेम्स आणखीनच वाढत जातात ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.

हेही वाचा:
सोडा हा फुकटेपणा
यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 स...
उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी

Thursday, 26 March 2015

कम्युनिकेशन स्कील: छोट्या शब्दांची मोठी जादू

-महावीर सांगलीकर
9145318228 Talks
8149703595 Whats App


कोणत्याही मंत्रांपेक्षा Thank You, Sorry, Congrats, Good Morning, welcome, Well done, bye  हे शब्द जास्त शक्तिशाली आहेत. हे शब्द तुम्हाला पॉझिटिव्ह बनवतात. तुम्हाला मानसिक शांती देतात. शिवाय हे शब्द उच्चारण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागत नाही. एखादा मंत्र म्हणण्यात तुमची कित्येक मिनिटे जातात, पण मी वर सांगितलेला एखादा शब्द म्हणायला फार तर दोन सेकंद लागतात.

बहुतेक मंत्र हे तुम्हाला न कळणा-या भाषेत असतात. तुम्हाला त्यांचा अर्थ माहीत नसतो. याउलट वरील शब्द हे तुमच्या ओळखीचे असतात आणि तुम्हाला त्यांचा अर्थ चांगलाच माहीत असतो. त्यामुळे ते शब्द तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरल्याने तुम्हाला त्यांचा चांगलाच उपयोग होतो.

तुमच्या मंत्रोच्चाराने तुमचे लोकांशी असणारे संबंध सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. मंत्रोच्चाराने तुम्हाला एखादे वेळेस मानसिक शांति मिळेल पण त्यापलिकडे तुमचा कांही  फायदा होणार नाही.  मत्रोच्चाराने तुमची अडलेली कामे होण्याचा  प्रश्नच येत नाही. पण मी वर सांगितलेले शब्द उच्चारायची सवय तुम्हाला लागल्यास लोक तुमच्याशी आपुलकीने वागायला लागतील. वेळप्रसंगी तुमच्या मदतीला येतील. तुमचा लोकसंग्रह वाढत जाईल.

इथे तुम्ही हेही लक्षात घ्यायला पाहिजे की बहुतांश मंत्र हे देवाला खुश करण्यासाठी असतात. देव असलाच तर तो कांही खूष व्हायला किंवा रागवायला माणूस नाही. त्यामुळे तुम्ही स्वत:ला आणि इतरांना आपल्या बोलण्यातून, छोट्या छोट्या गोष्टीतून खूष केल्यास तुमचा जास्त फायदा होईल.

कांही देवभक्तांचा असा समज असतो की आपल्याला मदत करणारा माणूस देवाने आपल्याकडे पाठवला आहे. ठीक आहे, ज्याची त्याची श्रद्धा. पण मग त्या देवाने पाठवलेल्या माणसाशी व्यवस्थित, गोड बोलायला नको का?

तुम्हाला ज्या अडचणी येतात, अडथळे येतात त्याचे मुख्य कारण तुम्ही लोकांशी नीट बोलत नाही किंवा फारसे बोलत नाही हे असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे कम्युनिकेशन स्कील वाढवल्यास तुमचे सगळे अडथळे दूर होतील.


हेही वाचा:
यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 स...
सोडा हा फुकटेपणा
सदिच्छा नाकारू नका

Wednesday, 25 February 2015

विद्रोह घाला चुलीत.....

-महावीर सांगलीकर

कांही लोकांना सिस्टीमचा भयंकर राग येतो. ते सिस्टीमच्या विरोधात सतत बोलत असतात. सिस्टीम बदलायला पाहिजे असे म्हणतात त्यांचे हे बोलणे बेसलेस तर असतेच, पण त्यांच्या बोलण्यात एक विखार असतो. सिस्टीम, ती चालवणारे लोक यांच्या विरोधात हे लोक असभ्य भाषेत टीका करत असतात. त्यातील अनेकांना वाटते की सिस्टीम चालवणारे सध्याचे लोक बदलून तेथे दुस-या लोकांना बसवले की सिस्टीम नीट चालेल. त्यांचे हे विचार म्हणजे बालीशपणा आणि भोळेपणा यांचे अजब मिश्रण आहे.

सिस्टीमवर राग काढणा-यांचा खर प्रॉब्लेम वेगळाच असतो. एकतर हे लोक जीवनात अपयशी असतात, किंवा समाधानी नसतात. त्यातील अनेकांच्या घरी कलह असतो. हे लोक कोणतेही विधायक काम करत नसतात. आपल्या अपयशाचा राग सिस्टीमवर, ती चालवणा-यांच्या वर काढणे हे त्यांना सोयीस्कर असते. कारण सिस्टीम किंवा ती चालवणारे लोक यांना देण्यात येणा-या शिव्या तिथेपर्यंत पोहोचतच नसतात. त्यामुळे तिकडून कांही धोका नसतो. जिथे धोका आहे तिथे हे लोक चूप बसतात. म्हणजे बघा, आपला बाप रोज दारू पिवून घरात धिंगाणा घालतो, आईला मारहाण करतो त्यावेळी हे लोक बघत बसलेले असतात. आपल्या हौसिंग सोसायटीच्या प्रश्नांबद्दल सोसायटीच्या अध्यक्षाला बोलण्याची यांची हिम्मत नसते, आणि आपल्या गल्लीत तुंबलेल्या गटाराबद्दल नगरसेवकाला जाब विचारण्याचीही त्यांची हिम्मत नसते. त्यापेक्षा दिल्लीतल्या नेत्यांना शिव्या देणे किती सोपे असते...

अशा लोकांनी आधी स्वत:चे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातील राग इतरांच्यावर काढण्यापेक्षा त्याचे रुपांतर सकारात्मक कामात केले पाहिजे. तुम्ही सिस्टीम बदलू शकत नाही. ते तुमचे कामही नाही. जी कामे तुमचे स्वत:ची आहेत, कुटुंबाची आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर तुमची स्वत:ची सिस्टीम नीट चालू लागेल.

जेंव्हा तुम्ही सतत विद्रोही बोलता, विद्रोही लिहिता तेंव्हा खुशाल समजा की तुमचे जीवन चुकीच्या दिशेने चालेले आहे. तुमच्या या विद्रोहाची मुळे तुमच्या घरातच आहेत. तेथे तुम्ही संवाद करण्यात कमी पडता म्हणून तुम्ही सामाजिक विद्रोह करणा-या संघटनांमध्ये सामील होता. घरातील लोकांच्यावरील राग व्यवस्थेवर, एखाद्या समाजावर काढत बसता. एकदा का तुम्ही यात अडकला की तुमच्या आयुष्यातील बराच काळ वाया जाणार हे नक्की.

विद्रोह म्हणजे दुसरे तिसरे कांही नसून तुमच्या हार्मोन्समुळे झालेला केमिकल लोच्या आहे.

विद्रोही संघटनांपासून दूर राहायचे असेल तर आधी विद्रोही विचारांपासून दूर रहायला शिका. विद्रोही विचार पसरवणा-या साहित्यापासून दूर रहा. वाचायची आवडच असेल तर सकारात्मक, उपयोगी साहित्य वाचा. ललित साहित्य वाचा. जगातील उत्तम उत्तम लेखकांचे साहित्य वाचा. विद्रोही पुस्तकांना हातही लावू नका. तुमच्या घरात जर विद्रोही पुस्तके असतील तर त्यांची रद्दी घाला. घरात कचरा ठेवायचा नसतो, तसेच विद्रोही साहित्यही ठेवायचे नसते.

तुमच्यामुळे समाज परिवर्तन होईल असे वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. परिवर्तन हे परिस्थितीमुळे आपोआप होत असते. त्यासाठी विद्रोह, चळवळी असे वेगळे कांही करायची गरज नसते. भारतातली, जगातली सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती ही औद्योगिक क्रांतीमुळे झाली आहे. त्यामुळे परिवर्तनाचे श्रेय कोणाला द्यायचेच असेल तर ते प्रचंड रोजगार निर्मिती करणा-या भांडवलदारांना द्यावे लागेल.

तुमचे जीवन तुमच्यासाठी आहे. तुमच्या कुटुंबासाठी आहे. विद्रोह करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्या ऐवजी गरजू लोकांना योग्य कारणासाठी वेळप्रसंगी मदत करा. समाज सेवेची फारच हौस असेल तर एखादा उद्योग सुरू करा, आणि लोकांना रोजगार द्या. रोजगार निर्मितीएवढी मोठी समाजसेवा दुसरी असू शकत नाही.

सदिच्छा नाकारू नका

महावीर सांगलीकर
8149703595, 9623725249


ही 25 डिसेंबरची घटना आहे. मी व्हाट्स अॅपवरनं माझ्या सगळ्या मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारा मेसेज  पाठवला. बहुतेकांनी मला त्याचा प्रकारचा मेसेज, ग्रीटिंग इमेज उत्तर म्हणून पाठवले. पण एका मित्राने मला पुढील मेसेज पाठवला:

‘हा सण आपला आहे का? आपण का मेरी ख्रिसमस म्हणायचे? आजच्या दिवशी जगात अब्जावधी अंडी फोडली जातात, तुम्ही मेरी ख्रिसमस असा मेसेज पाठवून या पापात सहभागी होत आहात’

मला त्या मित्राची कीव करावीशी वाटली. मी त्याला मेसेज पाठवला, ‘अरे बाबा, हाच नियम तू दिवाळी या सणाला लावणार का? दिवाळीत पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जातात, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, वयस्क लोक, रोगी, गरोदर महिला यांना भयंकर त्रास होतो, पक्षी, प्राणी यांनाही त्रास होतो, कित्येक ठिकाणी आगी लागून माणसं मरतात. तू मला दिवाळीत मला शुभ दीपावली असा मेसेज पाठवला होतास. त्याचा अर्थ वरच्या सगळ्या पापात तू सहभागी झालास अस घ्यायचा का?’

पण त्याच्या नंतरही तो माझ्याशी वाद घालत बसला.

खरं म्हणजे कोणत्याही धर्माचा सण, उत्सव असतो त्या दिवशी सगळीकडे एक पॉझीटीव्ह वातावरण असते. त्या वातावरणाचा तुम्ही स्वत:साठी फायदा करून घ्यायला पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला कोणी शुभेच्छा दिल्या तर त्या तुम्ही नाकारल्या नाही पाहिजेत. त्या शुभेच्छा दुस-या धर्माशी संबधीत असल्या तरी तुम्ही त्या स्वीकारायला पाहिजेत. तुम्हाला कोणी ईदच्या दिवशी ईद मुबारक म्हटलं, ख्रिसमसला मेरी ख्रिसमस म्हटलं, दिवाळीला हॅप्पी दिवाळी म्हटलं तर तुम्ही या शुभेच्छा मनापासून स्वीकारल्या पाहिजेत आणि तुम्हीही तशाच प्रकारच्या शुभेच्छा द्यायला पाहिजेत.

कांही लोक प्रत्येक बाबतीत ‘आपले आणि त्यांचे’ या भेदभावाला बळी पडलेले असतात. कांही लोक विशिष्ट विचारसरणीला बळी पडलेले असतात, त्यामुळे दुस-या समाजाला आपलं शत्रू मानत असतात. कांही लोक तर इतके कर्मदरिद्री असतात की त्यांना कुणी ह्याप्पी दिवाली म्हटलं तर ते उलट शुभेच्छा देण्याऐवजी ‘इंग्रजीत शुभेच्छा का दिल्या?’ म्हणून वाद घालत बसतात... त्यांना 1 जानेवारीला हॅप्पी न्यू यिअर म्हटलं तर ‘ते आपले नववर्ष आहे का? आपण गुढी पाडव्याला ते साजरे करायला पाहिजे’ असा उपदेश करतात. या लोकांना ‘सलाम आलेकूम’ असे कुणी म्हणाले तर चालत नाही आणि कांही महाभागांना Good Morning हे शब्द सुद्धा चालत नाहीत. (सलाम आलेकूम या शब्दाचा धर्माशी कांही संबंध नाही, हे शब्द म्हणजे अरबी भाषेतली शुभेच्छा आहे. तिचा अर्थ ‘तुम्हाला शांती लाभो असा आहे).

हे सगळे सदिच्छा, शुभेच्छा नाकारणारे निगेटिव्ह लोक आहेत. अशा लोकांच्या पासून तुम्ही सावध राहिले पाहिजे आणि बिनदिक्कत तुमच्यापासून दूर केले पाहिजे. त्यांना सुधरवण्याच्या फंदात पडायला नाही पाहिजे, कारण हे लोक सुधारण्याच्या पलीकडचे असतात. उलट त्यांच्या सहवासात राहून तुम्हीच देखील निगेटिव्ह होण्याची शक्यता असते, निदान तुम्हाला डोकेदुखी होते आणि तुमचा वेळही वाया जातो.

शहाण्यांना उपदेशाची गरज नसते आणि मूर्खांना उपदेश करून त्याचा कांही उपयोग होत नसतो.

सुरवातीला सांगितलेला माझा मित्र सुधारण्याच्या पलीकडला हे लक्षात येताच मी त्याला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधनं आणि मनातनं त्याचवेळी काढून टाकलं.

हेही वाचा:
मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी?

Friday, 20 February 2015

सोडा हा फुकटेपणा

-महावीर सांगलीकर
9623725249


हा लेख लिहायचे कारण म्हणजे बरेच लोक माझ्याकडून फुकट सल्ल्याची अपेक्षा धरतात. पण तुम्हाला मिळणारा फुकट सल्ला निरुपयोगी असतो हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. कोणताही सल्ला तुम्ही जेंव्हा विकत घेता तेंव्हाच त्याचा तुम्हाला उपयोग होत असतो.

कांही लोकांना भरपूर पैसे मिळत रहातात. त्यांच्याकडे पैशांचा सतत ओघ चालू असतो. तर दुसरीकडे अनेकांना नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या दोन्ही परिस्थितिमागे अनेक कारणे आहेत. त्यातील एका कारणाची माहिती मी येथे देत आहे.

तुमच्याकडे येणारा पैशांचा प्रवाह अडवणारे एक मोठे कारण म्हणजे फुकटेपणा हा असतो. तुम्ही जर तुम्हाला एखादी वस्तू, सेवा, मार्गदर्शन, माहिती वगैरे फुकट मिळावी अशी इच्छा बाळगत असाल, तसे प्रयत्न करत असाल, तर तुमची ही प्रवृत्ती निश्चितच तुमच्याकडे येणा-या पैशांच्या प्रवाहाला अडवून धरते.

हे असे का घडते? त्याचे उत्तर सोपे आहे. जेंव्हा तुम्ही फुकटे बनता, तुम्हाला फुकटेपणाची सवय लागते, तेंव्हा विकत घेण्याची आणि विकत घेण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्याची तुमची प्रवृत्ती आपोआपच कमी होते किंवा mमरून जाते. फुकट जर मिळत असेल तर विकत कशाला घ्या? आणि फुकट जर मिळत असेल तर जास्त पैसे कशाला मिळवा? अशी घातक प्रवृत्ती तुमच्यात तयार होते.

फुकट मिळाल्याने आपले पैसे वाचतात असे तुम्हाला वाटू शकते, पण प्रत्यक्षात तुमचे पैसे वाचतच नसतात. फुकटेपणाने बचत करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करत असता. याउलट तुम्ही जेंव्हा विकत घेत असता, तेंव्हा त्यासाठी लागणारे पैसे तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत असता. विकत घेतल्यामुळे तुमचा खर्च वाढतो, आणि खर्च वाढला की तुमचे उत्पन्नही वाढते. फुकटेपणा, कंजूषपणा तुम्हाला आळशी बनवतो, याउलट जर तुम्ही सढळ हाताने खर्च करत असाल तर आळस तुम्हाला शिवतही नाही. तुमचा लोकसंग्रहही वाढतो.

तुम्ही जर फुकटे असाल तर मित्र मंडळीत, नातेवाईकांच्यात, समाजात तुमची प्रतिमा कशी बनत असेल याचाही तुम्ही विचार करायला पाहीजे. याउलट तुम्ही जेंव्हा सढळ हाताने खर्च करणारे असता, तेंव्हा तुमची एक चांगली प्रतिमा तयार होत असते. याचाही तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढवण्यास मदत होत असते.

हे जसे व्यक्तीला लागू होते तसे समाजालाही लागू होते. कांही समाजांना सरकारी नोकरीत आरक्षण आहे, अनेक क्षेत्रात सोयी सवलती आहेत, याउलट कांही समाजांना या गोष्टी मिळत नाहीत. ज्यांना सोयी-सवलती नाहीत, आरक्षण नाही ते समाज स्वत:च्या बळावर सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेले दिसतात, तर ज्यांना या गोष्टी मिळतात ते समाज मागेच राहिलेले दिसतात. 

पैशाकडे पैसा येतो, तसेच पैसे खर्च करणा-याकडेही पैसा येत असतो. अनेकांना ही गोष्ट विचित्र वाटेल, पटणारही नाही, पण तुम्ही ही गोष्ट स्वत: अजमावून बघू शकता. तुम्ही जर कंजूष असाल, फुकटे असाल तर पैसे खर्च करायला शिका, तुम्ही दुस-याकडून घ्याल त्याचा योग्य मोबदला देत चला, मग पहा काय घडते ते. या बाबतीत तुम्हाला कांही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.


हेही वाचा:
उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी
 

Friday, 6 February 2015

उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी

-महावीर सांगलीकर


’साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या विचारापासून तरुण-तरुणींनी दूर राहिले पाहिजे. तुमची विचारसरणी तर उच्च असायलाच पाहिजे, पण तुमचे राहणीमान देखील उच्चच असायला पाहिजे. तुम्ही उच्च दर्जाच्या कॉलेजमध्ये शिकायला पाहिजे, रस्त्यावरचा चहा पिण्याऐवजी, तेथे नाश्ता करण्याऐवजी चांगल्या हॉटेलमध्ये चहा-नाश्ता घ्यायला पाहिजे, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला पाहिजे. तुम्ही इलाईट क्लासमधले मित्र मिळवायला पाहिजेत आणि तुमचा बॉय फ्रेंड/गर्लफ्रेंड देखील इलाईट क्लासमधलाच पाहिजे. हे करण्यासाठी तुमचा जन्म इलाईट क्लासमधल्या घरातच झाला असला पाहिजे असे नाही. तुम्ही गरीब घरात जन्माला आला असला तरी वरील गोष्टी करू शकता. त्यासाठी तुमच्या मनावर असलेली ‘गरीब मानसिकतेची’ बंधने तुम्हाला झुगारून द्यावी लागतील. पैसा म्हणजे वाईट गोष्ट आहे, जास्त पैसे हे वाईट मार्गाने कमवले जातात, पैसे हे घाम गाळून म्हणजे शारीरिक कष्टानेच कमावले पाहिजेत हे कांही लोकांनी पसरवलेले तत्वज्ञान तुम्ही झुगारून दिले पाहिजे.

तुम्ही विद्यार्थी असतानाही उच्च राहणीमानासाठी आवश्यक असणारे पैसे सहजपणे मिळवू शकता. चांगल्या मार्गाने भरपूर पैसे मिळवण्याइतकी सोपी गोष्ट कोणतीच नाही, हे माझ्या अनेक तरुण क्लाएन्त्सनी अनुभवले आहे, अनुभवत आहेत. त्यांना पैशांच्या मागे धावावे लागत नाही, तर पैसेच त्यांच्याकडे धावत येतात. मला कित्येकदा असा अनुभव येतो की मी मोटीव्हेट केलेले माझे तरुण क्लाइएन्त्स माझ्या आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षा जरा जास्तच वेगात आणि अपेक्षेपेक्षा कमी वेळात स्वत:वर पैशांचा पाऊस पाडून घेत आहेत.

तुमच्याकडे पैसे येत नसतील तुम्ही ते येऊ नयेत अशी तुमची मानसिकता करून घेतली आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडायचे कसे? हे मी तुम्हाला सांगू शकतो. ही ऑफर तरुण विद्यार्थ्यांच्या बरोबरच इतरांसाठी देखील आहे, पण केवळ त्यांच्यासाठी, जे याबाबतीत गंभीर आहेत. Time wasters not allowed. 

-महावीर सांगलीकर
0 814 970 3595
इमेल: samdolian@gmail.com

मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी?

 -महावीर सांगलीकर


तुमचे मित्र कोण आहेत यावरून तुम्ही कोण आहात हे कळते. तुम्ही ज्यांच्या सहवासात रहाता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण आणि दुर्गुण तुमच्यात उतरत असतात.

तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.

1. जे लोक बुद्धीने, ज्ञानाने आणि मानाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी मैत्री करावी. त्यांच्या सहवासात राहावे.

2. जे लोक कांहीतरी विधायक काम करत असतात त्यांच्याशीही मैत्री करावी. त्यांच्या कामात शक्य होईल तसा हातभार लावावा.

3. गायक, संगीतकार, कलाकार, खेळाडू, वक्ते, लेखक, पत्रकार, संपादक, उद्योजक, प्रशासनातले अधिकारी, खाजगी उद्योगातील अधिकारी यांच्याशी ओळखी करून घ्याव्यात.

4. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि मनुष्यबळ आहे त्यांच्याशी सलोख्याचे संबध ठेवावेत. वेळप्रसंगी हे लोक तुमच्या उपयोगी पडू शकतात.


यांची संगत धरू नका

1. जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी, प्रांतवादी आणि इतर सर्व वाद घालणा-या लोकांपासून दूर राहावे.

2. जे लोक तुमचे मन इतर व्यक्तीविषयी अथवा समाजाविषयी कलुषित करतात, त्यांना आपल्या वा-यालाही उभे करू नये. अशा लोकांच्या संघटनांपासूनही दूर राहावे.

3. चहाड्या करणा-या लोकांना ताकीद द्यावी, ते न सुधारल्यास त्यांना दूर करावे.

4. रिकामटेकडे, निरर्थक गोष्टीत तुमचा वेळ वाया घालवणारे, केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी मैत्री करणारे यांची संगत धरू नये.

5. जे स्त्रियांच्या विषयी अनुदारपणे बोलतात, स्त्रियांच्याकडे विकृत नजरेने बघतात त्यांना आपल्यापासून दूरच ठेवावे.

6. व्यसनांच्या अतिआहारी गेलेल्या लोकांपासून दूर राहावे.

7. सर्व प्रकारच्या विद्रोही लोकांच्यापासून दूरच राहावे, कारण हे विद्रोही लोक कोणतेही विधायक काम करत नसतात, तर कुणाच्या तरी विरोधात बोलत/लिहित रहाणे हेच त्यांचे एकमेव काम असते.

8. जे लोक तोंडावर तुमची स्तुती करतात पण माघारी तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्याशी संबंध ठेवू नये.

यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 सोपे उपाय

 -महावीर सांगलीकर


पुढील सोपे उपाय केल्यास तुम्ही नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अनेक अडचणींवर सहज मात करता येते आणि पुढे येणा-या अडचणी टळतात. तुमच्या यशाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे.

1.    तुमचा चेहरा नेहमी हसरा ठेवा. त्याच्यावर दु:ख, वैताग, राग, उदासपणा अशा भावनांचा लवलेशही दिसू देऊ नका. चेहरा हसरा ठेवणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे. याउलट चेहरा दु:खी, उदास, रागीट, वैतागलेला ठेवण्यास तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. शिवाय असा चेहरा ठेवण्याने लोक तुमच्यापासून दूर जातात. याउलट हस-या चेह-यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. हस-या चेह-यामुळे तुम्ही प्रसन्न, आनंदी आणि पॉटझिटिव्ह रहाता, शिवाय तुमचा मित्रपरिवार वाढतो, आणि तुमचे क्लाएंट्सही वाढतात. तुमच्या यशाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे.

2.    लोकांशी आपुलकीने बोला. तुमचे हे बोलणे मनापासून पाहिजे. मनापासून आपुलकीने बोलण्यामुळे तुम्ही आनंदी रहाता आणि याच्यातून लोकांच्यामध्ये तुमची चांगली प्रतिमा तयार होते.

3.    एखादी तोंड ओळखीची, फारसा संबंध नसलेली व्यक्ति भेटली तरी त्या व्यक्तिकडे बघून हसा. ‘हाय,  हॅलो’ करा. अगदी अनोळखी व्यक्ति भेटली आणि ती तुमच्याकडे बघून हसली, तरी ती कोण आहे याचा विचार न करता तुम्हीही हसा.

4.    आनंदी, यशस्वी आणि पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत रहा. निगेटिव्ह, अपयशी, सतत दु:खी आणि व्यसनी लोकांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहा. विद्रोही. टीकाखोर लोकांपासूनही दूर रहा.

5.    एखाद्याने स्वत:च्या यशाची बातमी सांगितली, किंवा तुम्हाला दुसरीकडून ती कळली, तर त्या व्यक्तिचे मनापासून कौतुक करा. कॉन्ग्रॅट्स म्हणा. इतरांचे कौतुक करताना शब्दांची कंजूषी करू नका. भरभरून बोला. इतरांच्या वाढदिवसाला, चांगल्या प्रसंगी प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून शुभेच्छा द्या. आपल्या जवळच्या व्यक्तिंना योग्य प्रसंगी भेटवस्तू द्या. आपला आनंद, यश शेअर करा. लोकांच्या संपर्कात रहा. प्रत्यक्षात, फोनवर त्यांची ख्याली खुशाली विचारा. लहान मुलांच्यात लहान होऊन रमा. त्यांना आनंदी बनवा. तुमच्या आनंदी आणि यशस्वी रहाण्याचे रहस्य इतरांना आनंदी करण्यात आहे.

6.    तुमच्या मनात कसलेही निगेटिव्ह विचार आणू नका. Always Be Positive.

7.    भविष्याकडे बघत वर्तमानात जगा. तुमच्या भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी उगाळत बसू नका. इतरांच्या भूतकाळाचा अजिबात विचार करू नका.

8.    ज्या गोष्टींशी आपला संबध नाही, अशा विषयांवर चर्चा, वादविवाद करू नका. स्वत:बद्दल बोला. ज्या व्यक्तिशी बोलताय त्या व्यक्तीविषयी बोला. बिझनेस, कामधंदा, प्लॅन्स, प्रोजेक्ट्स याबद्दल बोला. यातून तुम्हाला आनंद आणि यश मिळेल, शिवाय तुमचा प्रवास यशाच्या दिशेने होईल.  तुम्ही तिस-या व्यक्तीबद्दल, संबंध नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलाल त्यावेळी तुम्हाला त्यातून कांहीच मिळणार नाही, उलट वादविवाद आणि डोकेदुखीच होण्याची शक्यता जास्त.

9.    स्वत:ला ओळखा. तुमच्या गुणांचा जास्तीत जास्त वापर करा. तुमच्या दोषांना आळा घाला. तुमच्या गुणांचा, ज्ञानाचा  इतरांना फायदा होऊ द्या. (आपले अनेक गुण दोष आपल्यालाच माहीत नसतात. आपल्या जन्मतारखेवरून समजू शकतात. त्यासाठी तुम्हाला एखाद्या न्यूमरॉलॉजिस्टला भेटावे लागेल).

10.    इतरांना मोटीव्हेट करा. यातून तुम्ही स्वत: मोटीव्हेट व्हाल.

11.    योग्य वेळी आपल्या भावनांना मोकळी वाट करून द्या. व्यक्त व्हा. तुमच्याकडे एकतरी अशी व्यक्ति पाहिजे की जिच्याशी तुम्ही मोकळेपणाने, लपवाछपवी न करता बोलू शकाल, चेष्टा मस्करी करू शकाल आणि त्या व्यक्तीपुढे मनापासून हसू शकाल आणि रडूही शकाल. प्रसंगी त्या व्यक्तीसाठी भला मोठा त्यागही करू शकाल.

12.    पेपरमधील फक्त उपयुक्त बातम्या आणि लेख वाचा. राजकीय बातम्या, निगेटिव्ह बातम्या, गुन्हेगारी वगैरे विषयांच्या बातम्या वाचायचे टाळा. टी. व्ही. वर राजकीय चर्चा, बातम्या बघण्यात आपला वेळ वाया घालवू नका. 

Mahaveer Sanglikar
Numerologist & Motivator
8149703595 , 9623725249