Advt.

Advt.

Tuesday, 24 February 2015

ज्ञान कुणाकडून आणि कसे मिळवावे?

-महावीर सांगलीकर 
9623725249

ज्ञान मिळवण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यातला श्रेष्ठ प्रकार म्हणजे दुस-या कुणाच्या मदतीशिवाय स्वत:च मिळवलेले ज्ञान. हे स्वत: चिंतन करून, अभ्यास करून मिळवता येते. Self Study is Supreme Study.  पण अशा प्रकारे ज्ञान मिळवणे फारच थोड्या लोकांना शक्य असते, कारण त्यासाठी लागणारी पात्रता, बुद्धिमत्ता सगळ्यांच्यात नसते. या प्रकारे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला सामान्य माणसांसारखे वागून चालत नाही. तुम्ही सामान्य माणसांपेक्षा वेगळे व्हावे लागते. तुम्ही जर असामान्य असाल तर मग तुम्हाला या प्रकारे ज्ञान मिळवणे सहज शक्य असते.

तुम्ही जर असामान्य असाल तर तुम्हाला मी किंवा आणखी कुणी ज्ञान कसे मिळवावे हे सांगायची कांहीच गरज नाही.

ज्ञान मिळवण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ज्ञानी लोकांच्याकडून ते मिळवणे. तुम्हाला या प्रकारे ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही खालील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

1.    तुम्हाला ज्या व्यक्तीकडून ज्ञान मिळवायचे आहे, ती व्यक्ति खरेच ज्ञानी आहे याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्या ज्ञानी व्यक्तीबाबत चार जाणकार लोकांकडून माहिती करून घ्यावी लागेल, तसेच प्रत्यक्ष ज्ञान मिळवताना तुम्हाला तुमची प्रज्ञा वापरून ती व्यक्ति खरेच ज्ञानी आहे की नाही हे ठरवावे लागेल. 

2.    ती व्यक्ति धर्म, पंथ, देश, प्रदेश, भाषा वगैरे कोणत्याही बाबतीत पक्षपाती नसली पाहिजे. ती व्यक्ति ज्ञानाच्या बाबतीत विशिष्ठ परंपरेची आग्रही नसायला पाहिजे, आणि त्या व्यक्तिचे ज्ञान तौलनिक (Comparative) असायला पाहिजे.

वरील गोष्टींची खात्री पटली की तुम्ही त्या व्यक्तीकडून ज्ञान मिळवायला हरकत नाही. ते मिळवताना तुम्ही खालील पथ्ये पाळली पाहिजेत.

1. जिच्याकडून ज्ञान मिळवायचे त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात आदरभाव पाहिजे.

2. ती व्यक्ति तुम्हाला ज्ञान देत असताना तुम्ही ते पूर्ण लक्ष देऊन घेतले पाहिजे. त्यावेळी तुमच्या मनात इतर कसलेही विचार नाही पाहिजेत.  तुम्ही मौन राहून ऐकले पाहिजे, आणि आपण ऐकत आहोत हे सांगणा-याच्या लक्षात येईल असे दिसले पाहिजे.

3. ज्ञान मिळवताना तुम्ही प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असायला पाहिजे.

4. ती व्यक्ति ज्ञान देत असताना तुम्ही मध्येच प्रश्न, शंका विचारता कामा नये. हे काम तुम्ही सर्व कांही ऐकून झाल्यावर केले पाहिजे. प्रश्न, शंका विचारताना तुम्ही ते नेमक्या शब्दात, थोडक्यात आणि नम्रपणे विचारले पाहिजेत.

5. प्रश्न, शंका विचारण्याचा तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे, ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल आणि शंकांचे निरसन होईल.

6. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की ज्ञान देणारी व्यक्ति तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि तुम्ही दुय्यम आहात.

7. जर तुमच्या लक्षात आले की ज्ञान देणारी व्यक्ति प्रत्यक्षात ज्ञानी नाही आणि ती चुकीचे सांगत असते, तर तुम्ही अशा व्यक्तीकडून ज्ञान घेणे बंद केले पाहिजे.

8. फुकट मिळालेले ज्ञान हे निरुपयोगी असते. त्यामुळे तुम्हाला ज्या व्यक्तिने ज्ञान दिले, तिला तिचा योग्य मोबदला दिला पाहिजे. हा मोबदला पैशाच्याच रुपात असला पाहिजे असे नाही, तर तुम्ही तो इतर प्रकारेही देऊ शकता. जर ज्ञान देणारा तुम्हाला मोफत ज्ञान देत असेल, तरीदेखील तुम्ही त्याचा मोबदला दिला पाहिजे. ज्ञान देणा-याने मोबदला घ्यायचे नाकारले तर तुम्ही तो मोबदला गरजूंना मदत म्हणून दिला पाहिजे, विशेषत: शैक्षणिक कामासाठी, गरजू विद्यार्थ्यांना वगैरे.

9. ज्ञान देणारी व्यक्ति वयाने तुमच्यापेक्षा लहान असली तरी वरील पथ्ये तुम्ही पाळली पाहिजेत.

तुम्हाला पुस्तके वाचूनही ज्ञान मिळवता येते. पण त्यासाठी काय वाचावे आणि काय वाचू नये याचे मूलभूत ज्ञान तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्ही चुकीची पुस्तके वाचली तर तुम्हाला चुकीचेच ज्ञान मिळेल.

हेही वाचा:
वाचक 
मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी?

No comments:

Post a Comment