Advt.

Advt.

Wednesday, 25 February 2015

सदिच्छा नाकारू नका

महावीर सांगलीकर
8149703595, 9623725249


ही 25 डिसेंबरची घटना आहे. मी व्हाट्स अॅपवरनं माझ्या सगळ्या मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारा मेसेज  पाठवला. बहुतेकांनी मला त्याचा प्रकारचा मेसेज, ग्रीटिंग इमेज उत्तर म्हणून पाठवले. पण एका मित्राने मला पुढील मेसेज पाठवला:

‘हा सण आपला आहे का? आपण का मेरी ख्रिसमस म्हणायचे? आजच्या दिवशी जगात अब्जावधी अंडी फोडली जातात, तुम्ही मेरी ख्रिसमस असा मेसेज पाठवून या पापात सहभागी होत आहात’

मला त्या मित्राची कीव करावीशी वाटली. मी त्याला मेसेज पाठवला, ‘अरे बाबा, हाच नियम तू दिवाळी या सणाला लावणार का? दिवाळीत पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जातात, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, वयस्क लोक, रोगी, गरोदर महिला यांना भयंकर त्रास होतो, पक्षी, प्राणी यांनाही त्रास होतो, कित्येक ठिकाणी आगी लागून माणसं मरतात. तू मला दिवाळीत मला शुभ दीपावली असा मेसेज पाठवला होतास. त्याचा अर्थ वरच्या सगळ्या पापात तू सहभागी झालास अस घ्यायचा का?’

पण त्याच्या नंतरही तो माझ्याशी वाद घालत बसला.

खरं म्हणजे कोणत्याही धर्माचा सण, उत्सव असतो त्या दिवशी सगळीकडे एक पॉझीटीव्ह वातावरण असते. त्या वातावरणाचा तुम्ही स्वत:साठी फायदा करून घ्यायला पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला कोणी शुभेच्छा दिल्या तर त्या तुम्ही नाकारल्या नाही पाहिजेत. त्या शुभेच्छा दुस-या धर्माशी संबधीत असल्या तरी तुम्ही त्या स्वीकारायला पाहिजेत. तुम्हाला कोणी ईदच्या दिवशी ईद मुबारक म्हटलं, ख्रिसमसला मेरी ख्रिसमस म्हटलं, दिवाळीला हॅप्पी दिवाळी म्हटलं तर तुम्ही या शुभेच्छा मनापासून स्वीकारल्या पाहिजेत आणि तुम्हीही तशाच प्रकारच्या शुभेच्छा द्यायला पाहिजेत.

कांही लोक प्रत्येक बाबतीत ‘आपले आणि त्यांचे’ या भेदभावाला बळी पडलेले असतात. कांही लोक विशिष्ट विचारसरणीला बळी पडलेले असतात, त्यामुळे दुस-या समाजाला आपलं शत्रू मानत असतात. कांही लोक तर इतके कर्मदरिद्री असतात की त्यांना कुणी ह्याप्पी दिवाली म्हटलं तर ते उलट शुभेच्छा देण्याऐवजी ‘इंग्रजीत शुभेच्छा का दिल्या?’ म्हणून वाद घालत बसतात... त्यांना 1 जानेवारीला हॅप्पी न्यू यिअर म्हटलं तर ‘ते आपले नववर्ष आहे का? आपण गुढी पाडव्याला ते साजरे करायला पाहिजे’ असा उपदेश करतात. या लोकांना ‘सलाम आलेकूम’ असे कुणी म्हणाले तर चालत नाही आणि कांही महाभागांना Good Morning हे शब्द सुद्धा चालत नाहीत. (सलाम आलेकूम या शब्दाचा धर्माशी कांही संबंध नाही, हे शब्द म्हणजे अरबी भाषेतली शुभेच्छा आहे. तिचा अर्थ ‘तुम्हाला शांती लाभो असा आहे).

हे सगळे सदिच्छा, शुभेच्छा नाकारणारे निगेटिव्ह लोक आहेत. अशा लोकांच्या पासून तुम्ही सावध राहिले पाहिजे आणि बिनदिक्कत तुमच्यापासून दूर केले पाहिजे. त्यांना सुधरवण्याच्या फंदात पडायला नाही पाहिजे, कारण हे लोक सुधारण्याच्या पलीकडचे असतात. उलट त्यांच्या सहवासात राहून तुम्हीच देखील निगेटिव्ह होण्याची शक्यता असते, निदान तुम्हाला डोकेदुखी होते आणि तुमचा वेळही वाया जातो.

शहाण्यांना उपदेशाची गरज नसते आणि मूर्खांना उपदेश करून त्याचा कांही उपयोग होत नसतो.

सुरवातीला सांगितलेला माझा मित्र सुधारण्याच्या पलीकडला हे लक्षात येताच मी त्याला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधनं आणि मनातनं त्याचवेळी काढून टाकलं.

हेही वाचा:
मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी?

No comments:

Post a Comment