Advt.

Advt.

Wednesday, 25 February 2015

विद्रोह घाला चुलीत.....

-महावीर सांगलीकर

कांही लोकांना सिस्टीमचा भयंकर राग येतो. ते सिस्टीमच्या विरोधात सतत बोलत असतात. सिस्टीम बदलायला पाहिजे असे म्हणतात त्यांचे हे बोलणे बेसलेस तर असतेच, पण त्यांच्या बोलण्यात एक विखार असतो. सिस्टीम, ती चालवणारे लोक यांच्या विरोधात हे लोक असभ्य भाषेत टीका करत असतात. त्यातील अनेकांना वाटते की सिस्टीम चालवणारे सध्याचे लोक बदलून तेथे दुस-या लोकांना बसवले की सिस्टीम नीट चालेल. त्यांचे हे विचार म्हणजे बालीशपणा आणि भोळेपणा यांचे अजब मिश्रण आहे.

सिस्टीमवर राग काढणा-यांचा खर प्रॉब्लेम वेगळाच असतो. एकतर हे लोक जीवनात अपयशी असतात, किंवा समाधानी नसतात. त्यातील अनेकांच्या घरी कलह असतो. हे लोक कोणतेही विधायक काम करत नसतात. आपल्या अपयशाचा राग सिस्टीमवर, ती चालवणा-यांच्या वर काढणे हे त्यांना सोयीस्कर असते. कारण सिस्टीम किंवा ती चालवणारे लोक यांना देण्यात येणा-या शिव्या तिथेपर्यंत पोहोचतच नसतात. त्यामुळे तिकडून कांही धोका नसतो. जिथे धोका आहे तिथे हे लोक चूप बसतात. म्हणजे बघा, आपला बाप रोज दारू पिवून घरात धिंगाणा घालतो, आईला मारहाण करतो त्यावेळी हे लोक बघत बसलेले असतात. आपल्या हौसिंग सोसायटीच्या प्रश्नांबद्दल सोसायटीच्या अध्यक्षाला बोलण्याची यांची हिम्मत नसते, आणि आपल्या गल्लीत तुंबलेल्या गटाराबद्दल नगरसेवकाला जाब विचारण्याचीही त्यांची हिम्मत नसते. त्यापेक्षा दिल्लीतल्या नेत्यांना शिव्या देणे किती सोपे असते...

अशा लोकांनी आधी स्वत:चे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातील राग इतरांच्यावर काढण्यापेक्षा त्याचे रुपांतर सकारात्मक कामात केले पाहिजे. तुम्ही सिस्टीम बदलू शकत नाही. ते तुमचे कामही नाही. जी कामे तुमचे स्वत:ची आहेत, कुटुंबाची आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर तुमची स्वत:ची सिस्टीम नीट चालू लागेल.

जेंव्हा तुम्ही सतत विद्रोही बोलता, विद्रोही लिहिता तेंव्हा खुशाल समजा की तुमचे जीवन चुकीच्या दिशेने चालेले आहे. तुमच्या या विद्रोहाची मुळे तुमच्या घरातच आहेत. तेथे तुम्ही संवाद करण्यात कमी पडता म्हणून तुम्ही सामाजिक विद्रोह करणा-या संघटनांमध्ये सामील होता. घरातील लोकांच्यावरील राग व्यवस्थेवर, एखाद्या समाजावर काढत बसता. एकदा का तुम्ही यात अडकला की तुमच्या आयुष्यातील बराच काळ वाया जाणार हे नक्की.

विद्रोह म्हणजे दुसरे तिसरे कांही नसून तुमच्या हार्मोन्समुळे झालेला केमिकल लोच्या आहे.

विद्रोही संघटनांपासून दूर राहायचे असेल तर आधी विद्रोही विचारांपासून दूर रहायला शिका. विद्रोही विचार पसरवणा-या साहित्यापासून दूर रहा. वाचायची आवडच असेल तर सकारात्मक, उपयोगी साहित्य वाचा. ललित साहित्य वाचा. जगातील उत्तम उत्तम लेखकांचे साहित्य वाचा. विद्रोही पुस्तकांना हातही लावू नका. तुमच्या घरात जर विद्रोही पुस्तके असतील तर त्यांची रद्दी घाला. घरात कचरा ठेवायचा नसतो, तसेच विद्रोही साहित्यही ठेवायचे नसते.

तुमच्यामुळे समाज परिवर्तन होईल असे वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. परिवर्तन हे परिस्थितीमुळे आपोआप होत असते. त्यासाठी विद्रोह, चळवळी असे वेगळे कांही करायची गरज नसते. भारतातली, जगातली सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती ही औद्योगिक क्रांतीमुळे झाली आहे. त्यामुळे परिवर्तनाचे श्रेय कोणाला द्यायचेच असेल तर ते प्रचंड रोजगार निर्मिती करणा-या भांडवलदारांना द्यावे लागेल.

तुमचे जीवन तुमच्यासाठी आहे. तुमच्या कुटुंबासाठी आहे. विद्रोह करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्या ऐवजी गरजू लोकांना योग्य कारणासाठी वेळप्रसंगी मदत करा. समाज सेवेची फारच हौस असेल तर एखादा उद्योग सुरू करा, आणि लोकांना रोजगार द्या. रोजगार निर्मितीएवढी मोठी समाजसेवा दुसरी असू शकत नाही.

1 comment: